Showing posts with label S-पद्मजा फेणाणी-जोगळेकर. Show all posts
Showing posts with label S-पद्मजा फेणाणी-जोगळेकर. Show all posts

सर्वस्व तुजला वाहुनी,Sarvasva Tujala Vahuni

सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका वेड्यापिशा स्वप्‍नांतुनी

माझ्या सभोती घालते माझ्या जगाची भिंत मी
ठरते परि ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते छाती तुझी ती मानुनी

लवलव करी पात,Lavlav Kari Paat

लवलव करी पात डोळं नाही थाऱ्याला
एकटक पाहु कसं लुक-लूक ताऱ्याला

चवचव गेली सारी जोर नाही वाऱ्याला
सुटं-सूटं झालं मन धरू कसं पाऱ्याला

कुणी कुणी नाही आलं फडफड राव्याची
रूणझूण हवा का ही गाय उभी दाव्याची

तटतट करी चोळी तुटतुट गाठीची
उंबऱ्याशी जागी आहे पारूबाई साठीची

रक्तामध्ये ओढ मातीची,Raktamadhye Odha

रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण
मातीतुन मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत स्नान समाधीमधे डुबावे
दंवात भिजल्या प्राजक्तापरि ओल्या शरदामधि निथळावे

हेमंताचा ओढून शेला हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर
जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरि तुजला ध्यावे तुजला ध्यावे

युगामागुनी चालली रे,Yugamaguni Chalali Re

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतिची याचना

नव्हाळीतले ना उमाळे, उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझुनी अता यौवनाच्या मशाली
उरी राहिले काजळी कोपरे !

परी अंतरी प्रीतिची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन्‌ जागती
न जाणे न नेणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती !

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्का-फुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचून देवा,
मला वाटते विश्व अंधारले !

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेज:कण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारूनी दारूण.

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी याचना प्रीतिची लाजुनी लाल-
होऊनिया लाजरा मंगळ.

निराशेत संन्यस्त होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला धृव
पिसाटापरी केस पिंजारूनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव !

परि भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे !

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग, तुझ्या-
स्मृतीने उले अन्‌ सले अंतर !

गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा !

अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्‌
मला ज्ञात मी एक धूलीकण
अलंकारण्याला परी पाय तुझे
धुलीचेच आहे मला भूषण !



माझिया दारात चिमण्या,Majhiya Darat Chimanya

माझिया दारात चिमण्या आल्या
अबोल काहीसे बोलून गेल्या

कळले सारे नि कळले नाही
अबोध मनाची हासली जुई

दाटून निशात उतला गंध
झडली जाणीव गळले बंध

प्राणांस फुटले अद्‍भूत पंख
तंद्रीत भिनला आकाश डंख

माझिया दारात चिमण्या आल्या
आगळे वेगळे सांगून गेल्या

बाळ उतरे अंगणी,Baal Utare Angani

बाळ उतरे अंगणी बाळ उतरे अंगणी

बाळ उतरे अंगणी, आंबा ढाळतो साऊली
चिमुकल्या पायांखाली सारी मखमल सावळी

बाळ उतरे अंगणी, खाली वाकली सायली
हाती बाळाच्या यावीत फुले, फुलांची डहाळी


बाळ उतरे अंगणी, भान कशाचे न त्याला
उंचावून दोन्ही मुठी कण्या शिंपीतो चिऊला

बाळ उतरे अंगणी, कसे कळाले चिऊला
भर्भरा उतरून थवा पाखरांचा आला

धिटुकल्या चिमण्यांची बाळाभोवती खेळण
चिमुकल्या अंगणाची बाळाभोवती राखण

प्रीती जडली तुझ्यावरी,Preeti Jadali Tujhyavari

प्रीती जडली तुझ्यावरी, कळेल का ते तुला कधी?
कळेल कधी का ते तुला कधी, काय उमलते मनामधी ?

नजर भेटता नजरेला बिंब लोचनी ते ठसते
धडधडते काळीज उरी वीज नसांमधुनी घुसते
ओठांवर जे थरथरते, ओळखशील का सांग कधी ?

पैलतिरावर मूर्ति तुझी वाट बघे मी ऐलतिरी
घुमतो पावा एक इथे सूर भरी लहरी लहरी
कसे पोचवू गीत तुला अफाट वाहे मधे नदी !

ताण सोसवे मुळी न हा, व्याकूळ झाला जीव अता

फुलल्यावाचून सुकायची अशीच का ही प्रेमकथा ?
साद घातली मी तुजला देशिल ना पडसाद कधी ?

पुस्तकातली खूण कराया,Pustakatali Khoon Karaya

पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस, पांढरे
पिसाहुनी सुकुमार काहिसे देता-घेता त्यात थरारे

मेजावरचे वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला
देता-घेता उमटे काही मिना तयाचा त्यावर जडला

असेच काही द्यावे-घ्यावे, दिला एकदा ताजा मरवा
देता-घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा

पाऊस कधीचा पडतो,Paus Kadhicha Padato

पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने.

डोळ्यांत उतरते पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दु:खाचा उडला पारा..... या नितळ उतरणीवरती.

पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला ?
ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला.

संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा !

दारा बांधता तोरण,Dara Bandhata Toran

दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाउले

भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी
दार नटून उभेच नाही मिटायाची बोली

सूर्यकिरण म्हणाले घालु दारात रांगोळी
शिंपू पायावरी दंव म्हणे वरून पागोळी

भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून
देईन मी आशिर्वाद केळ म्हणाली हासून


येरझारा घाली वारा गंध मोतिया घेउनी
सोनचाफ्याची पाउले आज येतील अंगणी

सोनचाफ्याची पाउले आज आलीत अंगणी

क्षितिजी आले भरते ग Khitiji Aale Bharate Ga

गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले

शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले




क्षितिजी आले भरते ग

घनात कुंकुंम खिरते ग




झाले अंबर

झुलते झुंबर

हवेत अत्तर तरते ग




लाजण झाली धरती ग

साजण काठावरती ग

ऊन्हांत पान

मनांत गान

ओलावुन थरथरते ग




नाते अपुले न्हाते ग

हो‍उनि ऋतुरस गाते ग

तृणांत मोती

जळांत ज्योती

लावित आले परते ग.




सरिंवर सरी आल्या ग

सचैल गोपी न्हाल्या ग

केव्हा तरी पहाटे,Kevha Tari Pahate

केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली !

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे .....
आकाश तारकांचे, उचलून रात्र गेली!

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली !

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी .....
( हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली )

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा .....
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली ?



कलिका कशा ग बाई,Kalika Kasha Ga Bai

कलिका कशा ग बाई भुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या
सजून-धजून बाई, भरात कलली जाई
लाजून-बुजून बाई, उरात फुलली जुई
फुलली जाई फुलली जुई
जाई-जुई जाई-जुई
फुलल्या कशा ग बाई फुलल्या

इवल्या फुलात बाई फुलल्या

अवखळ वाऱ्यात काळोख वाहे
थरथर पानात भरून राहे
सलज्ज कोवळ्या जाईजुईच्या
मनात चांदणे चोरून पाहे
भवती काजळी राही, धवल ठसली जाई
तमाळ रंगात काही, विभोर हसली जुई
झुलली जाई झुलली जुई
जाई-जुई जाई-जुई
झुलल्या कशा ग बाई झुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या

मुग्ध हरपल्या कुपित, चित्तचोर गंध कोंदला
लुब्ध उकलता गुपित ओसंडून मुक्त नांदला

नितळ निवांत पाही नाजूक-साजूक जाई
झाकून तळवे राही मिटून लोचन जुई
डोलली जाई डुलली जुई

जाई-जुई जाई-जुई
डुलल्या कशा ग बाई डुलल्या
इवल्या फुलात बाई खुलल्या

रात्र संपली, निळी उषा सुरम्य रंग रंगली
माळ गुंफली पहाट पाकळ्यां-कळ्यांत दंगली
ढळल्या दिशात दाही नाचली मोहक जाई
वळल्या नभात वाही सुगंध साजिरी जुई
कळली जाई कळली जुई
जाई-जुई जाई-जुई
कळल्या कशा ग बाई कळल्या
झुलल्या कशा ग बाई झुलल्या
कलिका कशा ग बाई भुलल्या
फुलल्या कशा ग बाई फुलल्या

एवढे तरी करून जा,Evadhe Tari Karun Ja

एवढे तरी करून जा
हा वसंत आवरून जा

ही न रीत मोहरायची
आसवांत मोहरून जा

तारकांपल्याड जायचे
ह्या नभास विस्मरून जा

ये उचंबळुन अंतरी
सावकाश ओसरून जा

ह्या हवेत चंद्रगारवा ..
तू पहाट पांघरून जा

ये सख्या, उदास मी उभी
आसमंत मंतरून जा

अर्धीच रात्र वेडी,Ardhich Ratra Vedi

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले जाता सरून गेले
नाही हिशेब केले येतील शाप कानी

आता न सांध्य तारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी

आला किनारा आला किनारा, Aala Kinara Aala Kinara

आला किनारा, आला किनारा
निनादे नभी नाविकांनो इशारा

उद्दाम दर्यामध्ये वादळी
जहाजे शिडावून ही घातली
जुमानीत ना पामरांचा हकारा

प्राकाशे दिव्यांची पहा माळ ती
शलाका निळ्यालाल हिंदोलती
तमाला जणू ये अग्नीचा फुलोरा

जयांनी दले येथ हाकारली
क्षणासाठी या जीवने जाळली
सुखैनैव स्वीकारून शूल-कारा

तयांची स्मृती गौरवे वंदुनी
उभे अंतीच्या संगरा राहुनी
किनाऱ्यास झेंडे जयाचे उभारा

आज एकांतात हळवी, Aaj Ekantat Halavi

आज एकांतात हळवी वेदना गंधीत झाली

अंगप्रत्यंगात हलके चांदण्यांची हाक आली



आर्जवी डोळ्यांत माझे गीत रेंगाळून होते

त्याच डोळी हळद होरी रात्र शृंगारात न्हाली




ती दिवा विझवून होती, मी पहाटे जागलो

ठेऊनी ओळी दिव्यांच्या ती पुढे मार्गस्थ झाली



एकदा हिरव्या ऋतूचा बहर स्वप्नांतून आला

हरवल्या दिवसास माझ्या साक्ष कवितेची मिळाली