Showing posts with label L-वसंत निनावे. Show all posts
Showing posts with label L-वसंत निनावे. Show all posts

हे आदिमा HE ADIMA

हे आदिमा, हे अंतिमा
जे वांछिले ते तू दिले
कल्पद्रुमा

हे आदिमा, हे अंतिमा
जे वांछिले ते तू दिले
कल्पद्रुमा

या मातीचे आकाश तू
शिशीरात या मधुमास तू
देशी मृता तू अमृता
पुरोषोत्तमा

या मातीचे आकाश तू
शिशीरात या मधुमास तू
देशी मृता तू अमृता
पुरोषोत्तमा

देणे तुझे इतुके शिरी
झालो ऋणी जन्मांतरी
अपकार मी, अपराध मी
परी तू क्षमा

देणे तुझे इतुके शिरी
झालो ऋणी जन्मांतरी
अपकार मी, अपराध मी
परी तू क्षमा

हे आदिमा, हे अंतिमा
जे वांछिले ते तू दिले
कल्पद्रुमा


Lyrics -वसंत निनावे VASANT NINAWE
Music -यशवंत देव, YASHAVANT DEV
Singer -रामदास कामत RAMADAS KAMAT

सुख उभे माझिया द्वारी,Sukha Ubhe Majhiya Dwari

सुख उभे माझिया द्वारी घट भरभरुनी
द्वारकाधीश हा माझ्या अर्ध्या वचनी

ती आठवते मज स्वयंवराची वेळा
मी लिहिले होते प्रेमपत्र घननीळा
मी भाग्यवती मज हरिने नेले हरुनी

घालिते भुरळ ती वृंदावनिची राधा
भामेस जाहली प्राजक्ताची बाधा
अभिषिक्त परि मी भगवंताच्या नयनी

सारथी संगरी महारथींचा श्याम
मंदिरी माझिया प्रभुचा परि विश्राम
हर्षात हरवली यदुनाथाची राणी

लोक का करतात प्रीती,Lok Ka Karatat Priti

लोक का करतात प्रीती, कळत नाही
का फुले होतात माती, कळत नाही

मंद नंदादीप जेथे हा पुरेसा
वीज दाहक का रुचावी, कळत नाही

थांबते तृष्णा उरीची मधुघटांनी
मिटविशी ती का विषाने, कळत नाही

या दिशा सोडून साऱ्या ओळखीच्या
वाट परकी आवडे का, कळत नाही

प्रियतम दर्शन देई,Priyatam Darshan Dei

प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही

कमळ जळाविण, शशिविण रजनी
तशी बावरी तुजविण सजणी

रात्रंदिन व्याकूळ भटकते विरह काळजा जाळी

दिवसा भूक न रात्री निजणे
ओठ विसरले सर्व बोलणे
काय अंतरी ये न सांगता, तृप्त मीलनी होई

हृदयेश्वर, का मज कष्टविसी
भेट एकदा सदया मजसी
जन्मजन्मिची मीरा दासी, पडते तुझिया पायी

पाण्यातली परी मी,Panyatali Pari Mi

पाण्यातली परी मी, पाण्यातली परी मी
माझ्या मानातला मज, लाभेल काय स्वामी

घे शोध राजहंसा, माझ्या जरा प्रियाचा
तुझियापरी तयाचा, तो डौल चालण्याचा
त्याच्यापुढे झुके नभ, जाई नमून भूमी

त्याचे विशाल डोळे, कमळा, तुझ्याप्रमाणे
माझीच दिवस-रात्री ते पाहतात स्वप्ने
तुझियापरी तरंगा, मज आवरे न उर्मी


नगरीस मज प्रियाच्या, घेऊन जाइ नौके
मज शैशवातुनी तू दे यौवनात झोके
ये जवळ ये किनाऱ्या, होईन तव ऋणी मी

नच साहवतो हा भार,Nach Sahavato Ha Bhar

नच साहवतो हा भार
गीतामधुनी गेला निघुनी दूर आज गंधार

ओठ जरी हे माझे होते
सूर उरी हे तुझेच होते
तुझ्यावाचुनी जीवन माझे करूण आर्त उद्‌गार

स्वप्नावाचुन आता डोळे
चंद्रावाचुन अंबर काळे
वाट तृषेची कठीण, नसता जवळ मेघमल्हार

सरले दिन ते मंतरलेले
पुन्हा परीची शिळा जाहले
तुझ्यामुळे मी वीज जाहले, तुझ्यामुळे अंधार

देते तुला हवे ते,Dete Tula Have Te

देते तुला हवे ते, देते दहा दिशा रे
नेऊ नकोस माझी ही एवढी तृषा रे

हे मेघ घेउनी जा जे कोष अमृताचे

हा मोर राहु दे तू त्यांचा परि पिसा रे
जा चंद्र घेउनी हा मज वाट दावणारा
संपेल चांदणीचा अभिसार हा कसा रे ?

घे अंग कांचनाचे, घे रंग कुंतलांचे
हृदयांत या सलू दे दु:खाचिया कुसा रे
घे एवढे सभोवती मी राहणार नाही
होईन अमर परि मी पिऊनी अशा विषा रे

जेव्हा तुला मी पाहिले,Jevha Tula Mi Pahile

जेव्हा तुला मी पाहिले, वळुनी पुन्हा मी पाहिले

काही न आता आठवे, होतो कधी का भेटलो
पटता खुणा या वाद का, होतो कधी का भेटलो ?
या सागराने का कधी, होते नदीला पाहिले ?

जाणी तुझे नच नाव मी, प्रीती अनामिक जन्मता
वारा विचारी का फुला, हा गंध आहे कोणता ?
तू ऐस कोणी कामिनी, मी स्वामिनी तुज मानिले !

होऊन एकच चालणे, या दोन वाटा संपती
उंचावते तेथे धरा, आभाळ येई खालती
हरतात दोघेही जिथे, कोणी कुणाला जिंकिले ?

जमले तितुके केले तरिही,Jamale Tituke Kele Tarihi

जमले तितुके केले तरिही करणे उरले काही
नकोस येऊ मरणा अजुनी, जगणे सरले नाही

ऐकुनिया ही आजवरी जी गायिलीत मी गाणी
हसेल जर का कधी कुणाच्या पापणीतले पाणी
सार्थकता स्वरयात्रेची या याहुन दुसरी नाही


कुणि न गायिले असले गाइन जेव्हा केव्हा गीत
अखेरचे हे मूक हो‍उनी जावे तेंव्हा ओठ
अमर गीत ते युगांतरीचे स्मारक माझे होई

चुकचुकली पाल एक,Chukachukali Paal Ek

चुकचुकली पाल एक कालचक्र क्षण चुकले
नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले

रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट
धुक्यामधून मी तुझी शोधियली वाट वाट
परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले

अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी
इथे तिथे दवातही तुझीच मूर्ती सारखी
गीतातील सूर असे का मधेच पण तुटले


तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार
ही अशीच तव छाया पण मागे धावणार
सावल्यात साऱ्या, या चित्र असे मम कुठले

घे झाकून मुख हे चंद्रमुखी,Ghe Jhakun Mukha He

घे झाकून मुख हे चंद्रमुखी
प्रीतिस लागे दृष्ट सखी

गंध प्रीतिचा असतो हळवा
टाळ वादळे दुष्ट सखी

चंद्र असू दे अर्धा-मुर्धा
तिमिरी प्रीती पुष्ट सखी

अमिट सूर जरि उरी दटले
मीट आपुले ओष्ठ सखी
शब्दांवाचुन कळे प्रीतिला
डोळ्यांतिल उद्दिष्ट सखी

प्रीत असो, पण रीत असू दे
प्रीतीवर जग रुष्ट सखी

सरळ संथ हा पंथ जनांचा
प्रेमिक हे पथभ्रष्ट सखी

आभाळ कोसळे जेव्हा, Aabhal Kosale Jevha

आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे ?
सारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे ?

छाया न पित्याची पाठी, आईची न दिसली माया
पालवीहि फुटण्याआधी वठलेली अमुची काया
या दगडी भिंतीपुढती रडगाणे कुठवर गावे?

चत्‌कोर भाकरी का रे वाट्यास आमुच्या नाही ?
आहेत साखळ्या भारी असहाय आमुच्या पायी

कोणाच्या पुढती अमुचे चिमुकले हात पसरावे?

बोलका पुरावा आम्ही तुमच्या त्या सौजन्याचा
जातसे जीवही ज्याने तो खेळच दुर्जनतेचा
तुटल्या माळेमधले मणि फिरुनी कसे जुळावे?