Showing posts with label M-वीणा चिटको. Show all posts
Showing posts with label M-वीणा चिटको. Show all posts

सांग प्रिये सांग प्रिये,Sang Priye Sang Priye

सांग प्रिये, सांग प्रिये, घन भरून आले
पैलतीरी या अवेळी, मेघ आळवीले !

दशदिशा वादळी, अंतरी काजळी
संधिकालि या इथे अंधारुन आले !

दाटले आज गगन, का तुझे सजल नयन ?
पापणीत आसवांस गहिवरून आले !

सखी सांज उगवली,Sakhi Sanj Ugavali

सखी सांज उगवली !

क्षितीज मोहुनी, किरण पाहूनी
नभी आज विहरली
सखी सांज उगवली !

अनुराग रंगला, निशा उमलली
जाणून आज प्रीती आपुली, हृदयात बहरली
सखी सांज उगवली !

वायुसंगे येइ श्रावणा,Vayu Sange Yei Shravana

वायुसंगे येइ श्रावणा
जलधारांची छेडित वीणा

सप्तस्वर ते तव बरसाती
मैफल अपुली मधु रंगविती
रिमझिमती लय तालच देईल समिरांच्या पैंजणा

मंगल पहिल्या प्रसन्न प्रहरी
झरझरता सर तुझी हासरी
चैतन्याची दिसेल कांती सोनियाच्या दिना

भिजवुनि क्षण जीवनवर्षाचे
मयूर नर्तन बघ हर्षाचे
चढण तुझी जा चढुनि पाहुनी इंद्रधनूच्या खुणा

वाटे भल्या पहाटे यावे,Vate Bhalya Pahate Yave

वाटे भल्या पहाटे यावे तुझ्या महाली
हलकेच जागवावे गाऊनिया भूपाळी

झोपेत जाग थोडी असशील गुंगलेली
सुखपूर्ण गोड निद्रा फुलवील स्वप्नवेली
खुलताच स्वप्नसुमने होऊन तू अबोली

अनिरुद्ध अंतरीचा मी मंचकासमोर
जणु आणिला सखीने बांधूनि प्रेमदोर
हे मोरपंख तुझिया फिरवुनि दोन्ही गाली

मन माझे भुलले,Man Majhe Bhulale

मन माझे भुलले, वनराईच्या पानामधुनी
काल तुला पाहिले

बकुळ फुलांची गुंफुनी वेणी
नदीकाठी तू उभी साजणी
अवचित मी देखिले

अंतरीचे गीत उमगले
शतजन्मीचे नाते जुळले
वचन तुला दिधले

पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव,Purvechya Deva Tujhe

पूर्वेच्या देवा, तुझे सूर्यदेव नाव
प्रभातीच येशी सारा जागवीत गाव

विधाता जगाचा तूची उधळीत आशा

उजळिशी येता येता सभोवती जग, दिशा
रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव

अंधारास प्रभा तुझी मिळे प्रभाकर
दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर
सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव

पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस
तूच चालुनिया येशी माझिया घरास
भक्ताठायी गुंतलासे तुझा भक्तिभाव

अंबरातल्या निळ्या घनांची,Ambaratalya Nilya Ghananchi

अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला
मयुरा रे, फुलवीत ये रे पिसारा

जलधारेच्या वर्षावाने, हिरव्या कोमल अनुरागाने
वसुंधरेच्या श्वासाने हा गंधीत होई वारा

पानांचे मधुगीत गाउनी, थेंबांचे पदि नुपूर बांधुनी

रिमझिमणाऱ्या तालावरती नर्तन करी लयकारा