आला वसंत ऋतू आला,
वसुंधरेला हसवायाला,
सजवीत नटवित लावण्याला
आला, आला वसंत ऋतू आला
रसरंगांची करीत उधळण,
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला
आला, आला वसंत ऋतू आला
वृक्षलतांचे देह बहरले,
फुलाफुलांतुन अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा
आला, आला वसंत ऋतू आला
व्याकुळ विरही युवयुवतींना,
मधुर काल हा प्रेममिलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला
आला, आला वसंत ऋतू आला
No comments:
Post a Comment